बरेच दिवस विचार करत होते कि या विषयावर लिहावे, पण वेळ आज मिळाला आहे. कदाचीत प्रत्येक गोष्टिसाठी एक वेळ ठरलेली असते. IIT मधे शिकणे प्रत्येक अभियांत्रिकीच्या मुलाचे ( आणि मुलींचेही ) स्वप्न असते असे म्हटले तर ते अतिशयोक्ति ठरणार नाही. तसे ते माझेही स्वप्न होते. GATE चा आडथळा पार केल्यावर ते पुर्ण होण्याची चिन्हं मला दिसू लागली. माझ्या नशिबानी आणि थोडया प्रयत्नांनी मला ईथे पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली.मला IITB मधे admission मिळाली. मग काय मी तर पुर्ण हवेतच होतो. जो तो अभिनंदन करत होता, काहीना काहीतरी माहिती आणि सल्ले देत होता. मलाही तिथल्या सगळयाच गोष्टींबद्दल उत्सुकता लागुन राहीली होती. ईंटरव्हुच्यावेळी मी तसे हॉस्टेल्स आणि कँपसमधे फिरुन आलो होतो. पण आता प्रत्यक्ष तिथे रहायच्या, शिकायच्या कल्पनेनी खुप आनंद होत होता. ईथल्या लाईफबद्दल खुप ऐकले होते आता ते अनुभवायचे होते. ईथे आणि वरती नावात लाईफ हा शब्द मुद्दामुच वापरला आहे. कारण IIT मधे काही शब्द गेली कित्येक वर्षे चालत आले आहेत. त्यामुळे ति परंपरा मलही मोडुन चालणार नाही. ते शब्द पुढे येतच राहतील. असो तर ईथे आम्ही (एकदाचे) आलो.

गुगल अर्थवरुन घेतलेले चित्र (IIT)

हिरवागार परिसर (IIT) समीर हिल्स
ईथे आमचे स्वागत इतके जोरदार झाले की आख्खि मुंबई तो दिवस कधीही विसरणार नाही, म्हणजे २६ जुलैला आमचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. त्या दिवशी मुंबईत पावसाने नविन रेकॉर्ड बनवुन काय थैमान घातले ते मागील एका ब्लॉगमधे सांगितले आहेच. त्याच पावसाने मेसमधे पाणी आल्याने दुस-याच दिवशी मेस बंद पडली. पुढील दहा दिवस फक्त पाव, जॅमवर काढावे लागले. जेवणही सायकल पार्कींगमधे करावे लागत होते. एकुणच फार “पेन”(हा येथील काही नेहमीच्या शब्दांपैकी एक ) फुल सुरुवात झाली होती. पण हा पेन खुपच छोटा होता हे पुढे सेमीस्टर चालू झाल्यावर समजले.

हॉस्टेल नं १२
मला H-12 हॉस्टेल मिळाले होते. हे सगळ्यात नवीन हॉस्टेल असल्याने सर्वसोयियुक्त होते. हॉस्टेलमधे जिम्, टिव्ही रुम, कॉम्प्युटर लॅब, टे.टे ची सोय, ऑटोमॅटीक वॉशिंग मशीन्स, सततची स्वच्छता, रुममधे चोवीस तास ईटरनेट, कित्येक सर्व्हर्स, आणि दिवसरात्र चालू असलेले कँटीन यामुळे पहीले काही दिवस मी एकदम स्वर्गातच असल्यासारखे वाटत होते. पण लवकरच आमची अवस्था गोष्टीतल्या त्या, समोर पंचपक्वानाचे ताट वाढलेल्या पण हात बांधुन ठेवलेल्या माणसांसारखी झाली. कारण...
पहिल्या सेमीस्टरमधे खुप लोड असतो असे सगळ्या सिनिअर्सकडुन आधीच कळाले होते. त्यामुळे खुप अभ्यास करायचे असे ठरवुनच मी सुरुवात केली होती. आत्तापर्यंत परिक्षा आगदी तोंडावर आल्यावर अभ्यासाला लागण्याची सवय होती, तसे ईथे चालणार नव्हते. रोज सकाळी उठुन अभ्यास करण्याचे ठरवले होते. रात्रि जागुन अभ्यास करणे मला कधीही जमले नव्हते. पण ईथे जसजसे सेमीस्टरमधे पुढे जात होतो, तसतसे अभ्यासाचा लोड खुपच वाढत होता. आता रोज रात्रि एक, दोन वाजेपर्यंत जागुन अभ्यास करणे आता क्रमप्राप्त होते.( असे अनेक बदल माझ्यात घडत होते.) शिवाय सकाळी लवकर लेक्चर्स असायची ते वेगळीच. लवकरच सर्व प्राध्यापकांनी त्यांचे आवडती हत्यारं म्हणजे टेस्टस् आणि आसाईनमेंटस् बाहेर काढली. त्यांना तोंड देतादेता आगदी पुरेवाट झाली होती. ईथे प्रत्येक टेस्ट आणि असाईनमेंटस् चे मार्क सेमीस्टच्या शेवटी काउंट होत असल्यामुळे सतत चांगला परफॉर्मन्स देणे भाग होते. दिवसेंदिवस “ पेन ” वाढतच होता. दिवस आणि रात्रिमधे काहीच फरक वाटत नव्हता. आता रोजचे झोपणे चार-साडेचार तासांवर आले होते. एकदा माझा एक मित्र गमतीने म्हणाला होता की, “ आजकाल मी दोन मिनीटे मिळाली तरी झोपुन घेतो ”. अशातच प्रत्येक विषयांचे कोर्स सेमीनार दोन दोन मुलांच्या ग्रुप्सना देण्यात आले. पण संगणक आणि चोविस तास ईंटरनेट असल्यामुळे सेमीनारची तयारी करणे काहीसे सोपे जात होते. सिनीअर्सकडुन जरनल पेपर कसे शोधायचे ते शिकुन घेतले होत. शिवाय ‘ गुगल ’ सारखा कल्पवृक्ष मदतीला होताच. पण सेमीनारला खुपच जास्त वेटेज् असल्यामुळे जरा जास्तच ‘फाईट’ (येथिल आणखि एक प्रचलीत शब्द) मारावी लागत होती. हा कामाचा ताण आपल्यासारख्याच समःदुखी मित्रांमुळे आणि सिनीअर्सच्या ‘ पहीलीच सेमीस्टर एवढा लोड असतो ’ अशा आशावादी वाक्यांमुळे थोडा कमी होत होता. अशाप्रकारे एकुण पहीली सेमीस्टर, नंतर चांगले दिवस येतील या आशेवर काढत होतो. अभ्यासाबद्दल जरा जास्तच लिहीले असे दिसते.
शेवटी एकदाची ति पहीली सेमीस्टर संपली. मला तो दिवस कायम आठवणित राहील. २३ नोव्हेंबर च्या त्या संध्याकाळी आम्ही सगळया मुलांनी कँटीनमधे एकत्र जमुन खुप दंगा केला. सगळेजण सलग २-३ दिवस झोपले नव्हते, पण सेमीस्टर संपल्याचा आनंद सगळ्यांच्या चेह-यावर दिसत होता.
IITB मधिल खरं लाईफ माझ्या मते दुस-या सेमीस्टरमधेच चालू होते. जानेवारी मधे परत आल्यावर मग आम्ही इथल्या प्रत्येक गोष्टीत भाग घेण्याचे ठरवले. जिम, टे.टे, भटकंती, सर्व्हर्सवरुन पिक्चर घेउन पाहणे, यासारख्या अनेक गोष्टींमधे आम्ही लुडबुड करु लागलो. आता बरेच मित्र झाले होते. अभ्यासाचा लोडही जास्त नव्हता किंवा आता सवय झाली होती म्हणा, त्यामुळे ख-या अर्थाने आम्ही येथिल लाईफ एन्जॉय करत होतो. रात्रि जागणे ही आता एक सवय झाली होती. दोन अडीच वाजताही जबरजस्ती झोपावे लागत होते. रात्रि एक-दिडपर्यंत टेबल-टेनिस खेळुन, कँटीनमधे सर्वजण जमत असु आणि तिथे तर गप्पांना उत येत असे. तिथल्या विषयांना तर कसलीही बंधने नव्हती.
असेच एकदा चर्चा करताना आम्ही काही उत्साही मित्रांनी टेकफेस्टमधे भाग घेण्याचे ठरवले. ‘ टेकफेस्ट ’ हा भारतामधील सगळ्यात मोठा टेक्निकल फेस्टिवल आहे. भारतातल्या सगळ्या भागातून अनेक कॉलेजेसची मुले यात भाग घेतात. यासाठी कित्येक दिवस आधि तयारी करत असतात. दरवर्षी जानेवारीत हा भरवला जातो. आम्हाला तयारीसाठी जेमतेम आठ दिवस मिळणार होते. स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारिख उलटुन आता महीना होत आला होता. त्यामुळे पहिला अडथळा प्रवेश कसा मिळवायचा हा होता. पण हा प्रश्न आम्ही IIT चे विद्यार्थी असल्यामुळे आणि संयोजकांमधे आमचेच सिनिअर मित्र असल्याने सुटला. आता मात्र दिवसरात्र एक करुन काम करायचे होते.
आम्ही भाग घेतलेल्या स्पर्धेचे नाव होते, ‘ फुल थ्रोटल ’. एक दुरनियंत्रक संचालित वाहन बनवायचे होते, जे ४० मीटर सरळ अंतर २० सेकंदात कापेल. आम्ही पहिल्यांदा एक दोन डिझाईन बनविली आणि सरळ पुढील कामाला लागलो. सर्वप्रथम ३.२ सिसिचे छोटे आई. सि. ईंजिन शोधायचे होते. खुप ठिकाणी चौकशी केल्यावर आणि फिरल्यावर एका ठिकाणी २.५ सिसिचे विमानाचे ईंजिन आम्हाला मिळाले. पण आता ते ईंजिन बनविणा-या वाहनावर चालेल कि नाही याची कुणालाच खात्रि नव्हती. तसेच त्याची किंमत ही खुप होती. त्यामुळे काय करायचे ते ठरत नव्हते. शेवटी तिथेच चर्चा करुन निर्णय घेतला, आता एकदा ईंजिन विकत घेतल्यावर मागे फिरण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता स्पर्धा ४-५ दिवसांवर आली होती. आम्ही सगळे कामाला लागलो. गाडी बनवण्याचे काम एका लॅबमधे करत होतो. तिथे सगळी मशिन्स वापरायला मिळत असल्याने, वेगाने काम करणे शक्य होते. पण दिवसा लॅबमधे काम करणे शक्य नसल्याने आम्ही सगळेजण रात्रि १०.०० ला कामाला सुरुवात करत होतो. प्रत्येकाने कामाची विभागणी करुन आपले काम करणे चालू केले. वेळ कमी होता पण प्रत्येकाचा उत्साहमात्र वाखाणण्याजोगा होता. रात्रि दोन तिन वाजेपर्यंत काम करुन झाल्यावर कोणीतरी काही खायला घेउन येत असे. ते खाता खाता खुप दंगामस्ती चालत होती. येणा-या प्रोब्लेम्सवर चर्चा होत असे. खाणं झाल्यावर मग पुन्हा कामाला सुरुवात करुन साकाळी सहा-सात वाजेपर्यंत काम चालत असे. आता दिवसरात्रीमधे काहीच फरक उरला नव्हता. काम सतत चालूच होते. हळुहळू गाडी पुर्ण तयार झाली. त्यावर दुरनियंत्रकहि बसविला, पण अचानक एक संकट उभे राहीले. पहिल्यापासुनच गाडीचे ईंजिन चालू होण्यास खुपच त्रास देत होते. ईंजिनचे सेटींग निट जमत नव्हते. तसेच आमची गाडी सुरुवात करताच बंदही पडत होती. हा प्रोब्लेम ईतका मेजर होता की स्पर्धेतुन आधिच बाहेर पडण्याचाही विचार झला.
पण तेवढयात आमच्याच कॉलेजच्या एका दुस-या टिमच्या गाडीचे ईंजिन काम करत नसल्याचे कळाले. त्यांच्या गाडीची बॉडी आणि आमचे ईंजिन आणि दुरनियंत्रक प्रणाली वापरुन एक नवीन गाडी बनवण्याची कल्पना पुढे आली. त्यांच्याकडे स्टार्टर असल्याने गाडी सुरु करण्याचा प्रोब्लेम सुटू शकत होता. पण आता प्रश्न होता तो फक्त वेळेचा. स्पर्धा सुरु होण्यासाठी चोविस तासही उरले नव्हते. शेवटी पुन्हा एकदा फाईट मारुन एका रात्रित आम्ही गाडी बनविली.
आता टेस्ट केल्यावर गाडी निट चालत होती. स्पर्धेच्यावेळी आम्ही सगळे अतिशय उत्सुकतेने गा़डी उतरविली. स्पर्धा चालू झाली, आमची गाडी निम्मेअधिक अंतर गेली असेत तेवढयात अचानक दुरनियंत्रकात काही प्रोब्लेम आला, गाडी शेजारच्या संरक्षणासाठी लावलेल्या टायर्सवर आदळली आणि आम्ही स्पर्धेतुन बाहेर पडलो. आमचे गेले आठ दिवस घेतलेले सर्व कष्ट वाया गेले होते. त्यादिवशी कुणाचाच कशातही मुड लागत नव्हता. आम्ही हारलो होतो पण त्यातही खुपकाही शिकायला मिळाले होते. एकुण आम्ही टेकफेस्ट खुप आणि ख-या अर्थाने एंजॉय केले होते.
