Saturday, July 29, 2006

लाईफ इज् ब्युटीफुल





लाईफ इज् ब्युटीफुल

कधी कधी आपण आगदी ठरवुन एखादी गोष्ट करतो आणि तरिही मनासारखी होत नाही, तर कधी काही ध्यानिमनीही नसताना अचानक जमुन जाते आणि शब्द निघतात वा!. परवा असेचं घडले. त्याचे असे झाले की बरेच दिवस माझ्या संगणकात एक इंग्रजी चित्रपट ठेवला होता. चित्रपटाचे नावं होते “लाईफ इज् ब्युटीफुल”. सहज म्हणुन चालू केला आणि बघतच बसलो. दिड तासं कसा गेला मुळीच नाही कळाले. माझे मलाच आश्चर्य वाटत राहीले की इतके दिवस मी कसा काय पाहिला नाही. असो, चित्रपट अतिशय सुंदर आहे हे वेगळे सांगायला नकोच.
चित्रपट दुस-या महायुद्धाच्या काळातला आहे. नाझींनी ज्यु लोकांवर केलेले अत्याचार सर्वश्रृत आहेतच. त्यावेळी जर्मनांनी ज्यु लोकांना राबवुन घेण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी बरेच कॅंपस् उभारले होते. त्यांना डेथ कॅंपही म्हटले जात असे. अशाच एका कॅंपमधे चित्रपटातील आपल्या या नायकाला आणि त्याच्या मुलाला आणले जाते. ज्या दिवशी त्यांना नेले जाते त्याचं दिवशी मुलाचा वाढदिवस असतो. पण आपल्या मुलावर या बाहेरच्या क्रृर जगाचा जराही स्पर्श होउ नये म्हणुन झटणा-या नायकाची धडपड मनाला हालवुन जाते. स्वतःच्या मनातील राग आणि भिती गिळुन मग तो आपल्या मुलाला एका दुस-याच विश्वात घेउन जातो. ते विश्वही त्या मुला सारखेच अतिशय निरागस असते. तेथे सगळेजणच लपाछपीचा खेळ खेळत असल्याचे नायक आपल्या मुलाला भासवितो. तो खरोखरच खेळ असल्याचे भासविण्यासाठी त्या अत्यंत कठीण परिस्थितही अनेक वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधुन काढतो. स्वतः कितीही थकला असताना आपल्या मुलाला त्या प्रतिकुल परिस्थितीतही केवळ टवटवित ठेवण्यासाठी तो सतत झटत असतो. वेगवेगळ्या प्रसंगातुन हे अतिशय उत्कृष्टपणे दाखविले आहे. त्याची ही केविलवाणी धडपड डोळ्यात पाणी आणुन जाते. शेवटी डेथ कॅंपमधेही आपल्या मुलाचा जिव, बालपण आणि निरागसता वाचवण्यात तो यशस्वि होतो. पण या सर्व प्रयत्नात त्याला मात्र आपला जिव गमवावा लागतो.
असा हा एकदम वेगळा चित्रपट खरचं खुप परिणाम करुन जातो, खुप काही शिकवुन जातो.

Tuesday, July 04, 2006

मुंबईचा पाउस...माझा अनुभव

काय लिहावं ते विचार करत होतो. काहीचं ठरतं नव्हते मग म्हटले, पाउसाबद्दलच लिहुन श्रीगणेशा करावे, त्याच्याच साथित. खुप ऐकले होते मुंबईचा पाउस असा असतो, तसा असतो. पुर्वीपासुन खुप इच्छा होती की एकदा मुंबईचा पाउस पहायला मिळावा. तसा योग मागच्या वर्षी आलाही. मी मुंबईत पुढिल शिक्षणासाठी आलो होतो. ऐन पावसाळ्यात आमचा शैक्षणिक प्रवास सुरु होत होता. २६ जुलैला माझ्या या प्रवासाच्या पहील्याच दिवशी या पावसाने धो धो पडुन जोरदार हजेरी लावली. आमची सगळी लेक्चर्स पहिल्याच दिवशी बंद पाडली. मी एकदम खुष. आता मला मुक्तपणे पाउसाची मजा लुटता येणार होती.
आता काय करावे, नव्या कँपसमधे कुठे कुठे भिजत फिरावे याचा विचार करण्यासाठी आम्ही तिघे चौघे मित्रमंडळी जमलो होतो आणि.......
..... अचानक मझ्या मित्राच्या खोलीत, दाराखालुन एकदम पाण्याचे लोट शिरायला लागले. पाण्याचा वेग ईतका होता की पाण्याने काही क्षणातचं जवळजवळ एक फुटाची पातळी गाठली. मित्राची बॅग कॉटखालुन तरंगत बाहेर आली. मला तशाही परिस्थित एकदम टाईटॅनिक पिक्चरची आठवण झाली. आम्ही सगळेजण ओले होणारे सामान वरती ठेवण्याचे प्रयत्न करत होतो. एकजण बादलीने पाणी बाहेर काढत होता. पण पाणी ईतक्या प्रमाणात आत येत होते की थोडयाच वेळात आम्ही तो निष्फळ प्रयत्न सोडुन दिला. मग सामान आवरुन, वरती सुरक्षित जागी ठेवले आणि आम्ही बाहेर हॉस्टेलमधेच फिरायला जायचे ठरवले. बाहेर येउन पाहतो तो काय सगळेचजण आमच्यासारखेच फिरायला चालले होते. एकमेकांना स्वतःचे अनुभव सांगत होते. एकुण सगळेजण खुपच एन्जॉय करत होते.
शेवटी आम्हीही थोडे ईकडे तिकडे फिरलो, आणि खोलीत परत येउन पाहतो तो काय... ते न विचारता आलेले पाणी गुपचुप निघुन गेले होते. मागे फक्त भिंतीवर निषाणि ठेवुन गले होते. मग आम्ही ति एक आठवण म्हणुन भिंतीवर वेळ आणि तारिख नोंदवुन ठेवली. माझी खोली वरच्या मजल्यावर असल्याने त्या रात्रि सगळेजण माझ्याचकडे झोपायला आले होते. रात्रि पाउसाचीच चर्चा करताना केव्हा झोप लगली ते कळालेही नाही.
सकाळी उठलो तेव्हा पाउस थांबला होता, सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. चहा पिताना वर्तमानपत्र वाचले तेव्हा डोळ्यांवर विश्वास बसेना. पाउसाचा प्रहाराने संपु्र्ण मुंबई जणु काही थांबली होती. सगळीकडे पाउसाच्या विध्वंसाच्या खाणाखुणा दिसत होत्या. मी पटकन घरी फोन केला. मला सोडायला आलेले माझे वडील आजुन घरी पोहोचले नव्हते. त्याना दोन दिवस रेल्वेत काढावे लागले. नंतर ते सुखरुप घरी पोहोचल्याची बातमी मला मिळाली.

अशाप्रकारे माझा मुंबईच्या पाउसाचा अनुभव खुप वेगळा असाच होता. माझ्या वडिलांसाठी तो काही वेगळा होता. तसाच तो प्रत्येक मुंबईकरासाठी वेगवेगळाच असेल. काहींसाठी तो चांगला असेल तर काहींसाठी तो खुप वाईटही असेल. पण प्रत्येकासाठी तो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखामात्र नक्कीच होता.

आज जवळपास एक वर्ष पुर्ण होते आहे. तेव्हा विचार केला की माझा अनुभव जरुर सांगावा...